Monday, January 31, 2011

ओळखीच्या गीतांचे अनोळखी गीतकार

     बसल्या बसल्या सहज गाणी ऐकत होतो. शफल होत होत कोंबडी पळाली वाजायला सुरुवात झाली..
आता कोंबडी पळाली ऐकताना, तुम्हाला कोण कोण आठवतं? अजय अतुल, आनंद शिंदे, वैशाली सामंत,
भरत जाधव की क्रांती रेडकर? या गाण्याशी संबंधित एक व्यक्ती बराच काळ पडद्याआडच राहिली आणि
ती म्हणजे या गाण्याचा गीतकार. 'जितेंद्र जोशी'. आता जितू ने हे गाणं लिहिलं आहे हे बराच काळ लोकांना
माहितीच नव्हतं. आता ते हळू हळू कळायला लागलाय आणि जितेंद्र जोशी हे गीतकारही झाले..
       वेळ आणि इंटरनेट दोन्ही असलं की काय वाट्टेल तो टाईमपास करता येतो. "आठवणीतली गाणी"
हाताशी होतंच. म्हटलं चला जरा शोधूया अशी गाणी. त्यातून जे सापडलं ते तुमच्या समोर मांडतोय..

१) राधा ही बावरी:
          आता स्वप्नील बांदोडकरने गायलेलं हे गीत सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्या "तू माझा किनारा" या
     अल्बम मधलं. पण अशोकजी पत्कींनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत हे आहे का तुम्हाला ठावूक?
     या गाण्याचे बोल आणि संगीत दोन्ही अशोकजींचच आहे. वाचायचेत बोल? मग मारा टिचकी ..!

२) हिल हिल पोरी हिला:
                  ओल्ड हिट गाणं, परत "सातच्या आत घरात" मध्ये रिमिक्स झालं. राखीताई सावंतांच्या
            (त्याच हो इन्साफ वाल्या) आणि मकरंद अनासपुरे नाचले होते त्याच्यावर.  (काय सॉलिड कोम्बीनेशन
            आहे राखी सावंत - मकरंद अनासपुरे)
                   असो.. तर मूळ गाणं आहे "आंधळा मारतो डोळा" चित्रपटातलं. जयवंत कुलकर्णी आणि
           उषाताई मंगेशकरांनी गायलेलं, गाणारा व्हायोलीन वाल्या प्रभाकर जोगांनी संगीतबद्ध केलेलं
           आणि चक्क दादा कोंडकेंनी लिहिलेलं. दादांनी अजूनही काही हिट गाणी लिहिली आहेत बरका..!
           पहायचीयेत? मायला मग मारा की टिचकी ..!

३) यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या:
                 तुमच्या घरी आजोबा आहेत का? त्यांना जाऊन विचारा हे गाणं आठवतंय का ते! आज्जीला 
           अजिबात विचारू नका, मार खाल बेदम ..! १९३८ साली ब्रह्मचारी नावाच्या सिनेमात मीनाक्षी 
           शिरोडकरांवर हे गाणं चित्रित झालं. आता तुम्ही म्हणाल इसमे इतना इस्पेशल क्या है? तर गम्मत 
           अशी आहे की या गाण्यात मीनाक्षी बाईंनी चक्क स्विमसूट घातला आहे.! १९३७ साली गजब झाला
           होता या गाण्यामुळे. 
                   या मीनाक्षीबाई म्हणजे शिल्पा आणि नम्रता शिरोडकर भगिनींच्या आज्जी. सुदेश भोसले 
            पण त्यांचेच नातू. (हे जरा चेक करायचंय पण बहुतेक मी बरोबर आहे.) तेलुगु लोकांसाठी अजून एक
           ओळख म्हणजे , या आजीबाई म्हणजे महेशबाबूच्या आजेसासूबाई. नम्रता शिरोडकर यांनी महेशबाबुंशी
            लग्न केलाय ना..!  तर पैचान कोन बस झालं, आता गीतकार कोन ते सांगतो. हे गाणं प्रत्यक्ष 
            अत्रे साहेबांनी लिहिलेलं आहे. हे पिक्चर पण त्यांनीच प्रोड्यूस केलं होतं.अत्रेसाहेबांनी 
            "श्यामची आई" मधलं गाजलेलं "द्रौपदीसी बंधू शोभे" हे गाणं पण लिहिलं आहे.
            खरंच, अत्रेसाहेबांसारखा माणूस दहाहज्जार वर्षात होणे नाही..!

काय म्हणता? तुम्हाला अजून अशी गाणी माहिती आहेत?
अहो मग लिवा की राव कामेंट.!
आणि आवडली असेल पोस्ट तर तसं पण लिवा.!

आपलाच,
ओंकार

No comments:

Post a Comment